info@owlsindia.com

अथातो सर्पजिज्ञासा – भाग १-

काल उल्लेख केल्याप्रमाणे लॉक डाऊनच्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून साप या विषयावर लिहितोय. हा विषय गेली अनेक वर्षे डोक्यात असला (इतर अनेक गोष्टींबरोबरच), तरी त्यावर काही काम होत नव्हतं. खरतर महाडच्या राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाच्या निमित्ताने असं काहीतरी प्रकाशित करावं असाही प्रयत्न करत होतो. एक दोघांना सुचवले होतं लिहा म्हणून, पण काही कारणाने नाही झालं. आता मात्र रोज थोडं थोडं जमेल तसं लिहावं असा प्रयत्न असेल. हे लिखाण मात्र थोडं स्वैर, मुक्तछंदासारखं असेल. साप ह्या विषयाशी निगडित जे जे काही असेल, संस्कृती, धर्म, परंपरा असं सगळं. वैज्ञानिक दृष्टीने ही काही बाबी येतील पण फार स्कॉलरली लिखाण नसेल. सर्पमित्र चळवळ ह्याविषयी मात्र सविस्तर लिहावं असंही डोक्यात आहे. अस काही ठरवून लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाहू या कसं काय जमतंय. असो.

तसं पाहिलं तर मनुष्य प्राणी सापांशी आदिम काळापासून परिचित आहे पण कदाचित अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात त्या न्यायाने आजही आपल्याला सापांची पुरेशी माहिती झालेली नाही. अर्थात अनेकांची इच्छाही नसेल माहिती करून घेण्याची हे ही समजण्यासारखंच आहे, साप हा शब्दच अनेकांनी मृत्यूशी जोडलेला आहे. आणि अर्थातच त्यामुळे भीतीपोटी, सापांविषयी जाणून घेण्यासाठी सर्वच जण काही उत्सुक असतील असं नाही. आमच्या इथे कोकणात तर सापाला साप म्हणणं ही टाळणारे अनेक आहेत. मग बहुधा जनावर, लांबडं असे उल्लेख होतात. काहीठिकाणी तर साप चावला तरी पान लागलं असं अप्रत्यक्ष बोलावं असा संकेत आहे. ही भीती सुद्धा खूप आदिम आहे. ह्या भीतीमुळे कधी सापांना दैवी रूपं दिली गेली तर कधी सैतानी. आज असच विविध धर्मांत सापांच काय स्थान आहे ते पाहू या.
भारतीय संस्कृती मध्ये साप ह्या विषयावर आख्यायिकांची रेलचेल आहे. अनेक आपल्याला माहीतही आहेत. त्यामुळे त्याकडे वळण्याआधी इतर काही धर्मात सापांचा आलेला उल्लेख आधी पाहूया. आज प्रामुख्याने पाहू या अब्राहमिक धर्म, म्हणजे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मविचार यातील साप. या तिन्ही धर्मांचे सृष्टीच्या उत्पत्तीविषयीची धारणा साधारणतः सारखीच आहे.

Adam आणि Eve (मुस्लिम आदम आणि हव्वा) हे विधात्याने निर्मिलेले प्रथम मानव.आधी Adam ची निर्मिती केली, आणि मग त्याच्या बरगडीपासून eve ची. दोघेही नग्न पण त्यांना यांची जाणीवच नाही कारण तशी भावना, ते ज्ञान त्यांना नाही. ईश्वराने त्यांना बंधन घातलंय नंदनवनात कुठेही फिरा, खा, फक्त एका झाडाचं फळ नाही खायचं. ते झाड असत ज्ञानाचं. दोघेही अर्थातच ईश्वराच्या आज्ञेच पालन करत आनंदाने नंदनवनात रहात असतात.
आता इथे प्रवेश होतो सापाचा. एक साप, हा बोलू शकत असतो, किंबहुना अर्धं शरीरही मानवी आहे काही कथांनुसार, eve ला त्या झाडाचं फळ खायला सांगतो. Eve ची इच्छा नसते पण तो विविध प्रकारे तिला समजावतो आणि अखेरीस ती त्या झाडाचं फळ खातेच शिवाय adam लाही खायला देते. दोघांनाही ज्ञानप्राप्ती होते आणि त्याचबरोबर लज्जा. ईश्वराच्या हे लक्षात आल्यावर तो तिघांनाही जाब विचारतो आणि फैसला ही करतो.
सर्वात पहिला शाप मिळतो सापाला, त्याचे पाय नाहीसे होतात आणि तो कायम पोटावर सरपटत राहील असा शाप मिळतो. Eve ला प्रसववेदना आणि पुरुषांच्या अधिपत्याखाली राहण्याची शिक्षा मिळते. Adam ला अन्नासाठी राबावं लागेल आणि मृत्यू असे शाप मिळतात. बघा कसा न्याय आहे खरं तर सापानी कितीही सांगितलं तरी eve नी अवज्ञा केली होती पण पहिली शिक्षा झाली ती सापाला. बघा, तेव्हापासून आजपर्यंत, घरात उंदीर नांदतील अशी घाण करणार माणूस, पण त्याला खायला आला म्हणून मृत्युदंड सापाला, हे असंच चाललंय नाही का.
आता यात काही बारीक सारीक फरक आहेत. काही कथांमध्ये हा सर्प पुरुष आहे तर काही कथांमध्ये स्त्री. युरोपियन कलाकारांच्या या विषयावर भरपूर कलाकृती आहेत, त्याविषयी बोलू परत कधीतरी. पण अशाच एका चित्रात ह्या सापाचा चेहरा चक्क लहान मुलाचा दाखवलाय. ईतका गोंडस आणि निरागस आहे हा बच्चू की ह्याला त्या ट्री ऑफ नॉलेज चं नॉलेज कसं काय झालं बुवा हाच प्रश्न पडतो मला नेहमी.


मुस्लिम कथेत थोडा वेगळा फरक आहे. म्हणजे आदम, हव्वा, नंदनवन वगैरे सगळं तसंच आहे पण इथे मेन व्हिलन आहे इब्लिस नावाचा सैतान. ह्या इब्लिस वरूनच मला वाटत मराठीतला इब्लिस शब्द आला असावा. तसा हा इब्लिस खरं तर मुळात सैतान नसतो पण ईश्वराची अवज्ञा केल्यामुळे त्याची स्वर्गातून हकालपट्टी झालेली असते. हा इब्लिस मोर आणि सापाची मदत घेतो. मोराच्या मदतीने स्वर्गापर्यंत पोचतो. मग सापाच्या तोंडात बसून आत प्रवेश करतो. मग साप जे हव्वा शी बोलतो, ते खरं तर सापाच्या तोंडातून हा इब्लिसच बोलत असतो. मग पुढे सर्वांना शिक्षा वगैरे सुद्धा साधारणपणे सारख्याच आहेत.
आज पहिलाच लेख असल्याने इथेच थांबतो. आज नुसत्याच कथा लिहिल्यात, उद्या त्यावर मला जे काही वाटतं ते ही लिहितो. मोझेसचा दंड(सर्परूपी दंड / काठी) याविषयावर पण लिहायचय, फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती.
लेख किती मोठा / लहान होतोय अंदाज येत नाहीये. आत्ता सहज परत वाचताना धावतं वर्णन लिहिल्यासारखं वाटलं पण मुळात मला धर्म ह्या विषयावर नाही लिहायचय त्यातला साप माझ्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे ह्या कथा आणि त्यावर काही माझी मतं असं थोडं आहे.
ह्या फॉरमॅटमध्ये लिहिण्याचा सराव होईल हळूहळू (तुम्हाला ही होईल सवय हळूहळू वाचायची, थोडक्यात मी हे असंच लिहिणारे ).
असो, अभिप्राय जरूर कळवा. भेटू उद्या.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *